ST Bus : मलकापूर-बोरिवली एसटी सेवा सुरू

साखरपा : मलकापूर बोरिवली ही बंद झालेली एसटी फेरी प्रवाशांच्या मागणीनुसार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मालकापूर आगाराने घेतला आहे. ही एसटी सुरू व्हावी, यासाठी साखरपा येथील कमलाकर पाथरे यांनी प्रयत्न केले.

मलकापूर आगारातून बोरिवली ही एसटी गेली अनेक वर्षे नियमित सुरू होती. पण, गेली दोन वर्षे ही एसटी कमी भारमान म्हणून बंद करण्यात आली. त्यामुळे ही एसटी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी पाथरे यांनी मलकापूर आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश येऊन रविवारपासून ही एसटी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मलकापूर आगारातून ही एसटी सकाळी आठ वाजता सुटून साखरपा, देवरूख, चिपळूण, महाड, रामवाडी, सायनमार्गे बोरिवलीला जाईल. तसेच परतीच्या प्रवासासाठी सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी बोरिवली येथून सुटुन त्याचमार्गे मलकापूर येथे येईल.

वास्तविक पाथरे यांनी मलकापूर-परळ ही एसटी फेरी सुरू व्हावी, ही मागणी केली होती. साखरपा येथून मुंबईला जाण्यासाठी सध्या एकही एसटी सुरू नाही. साखरपा, देवड, देवळे या मुंबई फेऱ्या सध्या बंद असल्यामुळे साखरपा गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थाना मुंबई येथे जाण्यासाठी मोठी पंचाईत होत आहे. त्यासाठी मलकापूर-परळ ही बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पाथरे यांनी केली होती. पण, प्रत्यक्षात मलकापूर आगारातून त्याऐवजी बोरिवली फेरी सुरू केली आहे. मलकापूर-परळ ही एसटीही तातडीने सुरू करावी, अशी मागणी साखरपा पंचक्रोशीतील प्रवाशांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 15/Sep/2025