रत्नागिरी : पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली तरीही रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. किनारी भागात वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारीवरही परिणाम झाला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर मच्छीमारी व्यवसायाला जोर धरेल असे चित्र होते. परंतु वादळाची शक्यता असल्याने त्यात खंड पडण्याची भीती आहे. सध्या काही प्रमाणात पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा असे मासे हाती लागत आहेत. हर्णेपासून ३० ते ३५ वावात कोस्टल ट्युना हा मासा मोठ्याप्रमाणात आढळत आहे. त्यासाठी मुंबईतील मच्छीमारी नौका दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती. त्यामुळे कडकडीत ऊन पडले होते. शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री पाऊस सुरू झाला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून रिपरिप पाऊस पडत होता. परंतु दिवसभर हवेत गारवा होता. कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात रविवारी कमाल तापमान २८.१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २०.१ (अं.से.) नोंदले गेले आहे. शनिवारी (ता. १३) कमाल तापमान २९.५ तर किमान तापमान २०.७ अं.से. आहे. येत्या काही दिवसात परतीच्या पावसाला सुरवात होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (ता. १५) ऑरेंज अलर्ट दिला असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यानुसार समुद्रकिनारी भागात वातावरण आहे. हलके वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. त्याच परिणाम मासेमारीवर होईल, असे मच्छीमारांचे मत आहे.
गणेशोत्सव कालावधीत मासेमारी बंद होती. गेल्या चार-पाच दिवसांत मच्छीमारी समुद्रावर स्वार होऊन मासेमारीसाठी रवाना झाले होते. परंतु त्यांच्या हाती १० ते १२ जाळी पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी अशी मासळी लागत आहे. पापलेटचा किलोचा दर ४०० रुपये असला तरीही त्याचे प्रमाण कमी आहे. म्हाकुळ मासा कमी प्रमाणात असल्याने मच्छीमार चिंताग्रस्त झाले आहेत.
त्याला दरही चांगला मिळतो. एकीकडे स्थानिक मच्छीमारांना मासळी कमी मिळत असतानाच परजिल्ह्यातील मच्छीमारांची धास्ती कायम आहे. ट्गुना मासा पकडण्यासाठी परजिल्ह्यातील मच्छीमारी नौका हर्णेसह आजुबाजूच्या परिसरात दाखल होतात. गेल्या चार ते पाच दिवसांत हर्णेपासून ३० ते ५० वावात ट्युना मासा आढळून आला आहे. याबाबतचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. हा मासा मुंबईतील मच्छीमारी नौका जिल्ह्यात दाखल होऊ शकतात. त्यामुळे ट्युनाच्या बरोबरीने अन्य मासेही त्या नौकांच्या जाळ्याला लागू शकतात.
गणेशोत्सवानंतर मासेमारीला सुरुवात झाली असली तरीही अपेक्षित मासे जाळ्यात लागत नाहीत. सध्या समुद्रात वादळासारखी परिस्थिती आहे. त्याचा फटका मासेमारीला बसू शकतो. तसेच ट्युना मासा स्थानिक मच्छीमार पकडत नाहीत, परजिल्ह्यातील नौका त्यासाठी येथे येत असतात. – पांडुरंग राजवीर, मच्छीमार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 15/Sep/2025














