रत्नागिरी : रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते, पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष श्री. सुनील नावले (वय ५०) यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. सोमवारी सकाळी ओबीसी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. एका धडाडीच्या, सुस्वभावी आणि मनमिळाऊ नेतृत्वाला समाज मुकल्याने रत्नागिरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व
रत्नागिरी तालुक्यातील पावस दशक्रोशीतील रहिवासी असलेले सुनील गोपाळ नावले हे आपल्या साध्या राहणीमानासाठी आणि उच्च विचारसरणीसाठी ओळखले जात होते. कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी आणि संघटन कार्यासाठी ते नेहमीच अग्रभागी असत. केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही ते सक्रिय होते. त्यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापती पद यशस्वीपणे भूषवले होते. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. समाजकारणाबरोबरच ते एक यशस्वी आंबा बागायतदार म्हणूनही परिचित होते.
तो अखेरचा दिवस…
सोमवारचा दिवस सुनील नावले यांच्यासाठी नेहमीप्रमाणेच धावपळीचा होता. सकाळी कुणबी समाजेन्नती संघ, मुंबईच्या रत्नागिरी ग्रामीण शाखेतर्फे आयोजित ओबीसी आरक्षण आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर ते आपल्या निवासस्थानी परतले आणि तेथेही संघटनात्मक आणि सामाजिक कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते तपासणीसाठी रिक्षाने रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र, वाटेतच त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
गरजूंना न्याय देणारा नेता हरपला
सुनील नावले यांची समाजातील गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची तळमळ होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार २०२३ मध्ये त्यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. पदभार स्वीकारताच त्यांनी कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १८३ गरजू अर्जांना मंजुरी देऊन त्यांनी अनेक कुटुंबांना मोठा आधार दिला होता. त्यांचा हा कार्यकाळ गरजूंना न्याय मिळवून देणारा ठरला होता.
सर्वत्र शोककळा
त्यांच्या निधनाची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच सर्वांना मोठा धक्का बसला. सकाळी आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढणारा आपला सहकारी आता आपल्यात नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. एका सच्चा आणि तळमळीच्या कार्यकर्त्याच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.














