Chiplun : कामथे उपजिल्हा रुग्णालयात उद्या मोफत आरोग्य शिबिर

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. शिबिरात स्त्री रोग, हृदयरोग, मधुमेह, त्वचारोग, मानसिक आजार, मूत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, मिरगी (फिट), गुप्तरोग, एचआयव्ही/एड्स, नेत्र आणि गर्भाशयाचे आजार यासह बालरोगांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.

या शिवाय दंत तपासणी, मौखिक आरोग्य तपासणी व उपचार, रक्त व लघवी तपासणी, शुगर, ईसीजी इत्यादी तपासणी, सोनोग्राफी तपासणी, स्तन व गर्भाशयाचे कॅन्सर तपासणी, क्ष-किरण, सीटी स्कॅन तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आरोग्य जनजागृती स्टॉल्सद्वारे आरोग्यविषयक माहिती व सल्लादेखील दिला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 16/Sep/2025