खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात काल ओबीसी समाजाने भर पावसातही शासनाविरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त करत धडक मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या ओबीसी समाजाच्या घोषणांनी संपूर्ण तालुका दणाणून गेला.
इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित मागण्यांबरोबरच जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार काढण्यात आलेला जीआर तातडीने रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. भरणे येथील श्री काळकाई देवीच्या मंदिरापासून निघालेला हा मोर्चा खेड शहरात दाखल होऊन बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला.
मोर्चामध्ये महिला, प्रौढ, युवक, वृद्ध असा सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली, तर गडगडेल सरकार ! अशा रणधुमाळी घोषणा देत संतप्त जनसमुदाय तहसील कार्यालयावर दाखल झाला.
यावेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओबीसी समाजाच्या मागण्या तहसीलदार मार्फत पोहोचविण्यात आल्या. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 16/Sep/2025














