Sangameshwar : डिंगणी येथील आरोग्य उपकेंद्र कुलूप बंद

संगमेश्वर : डिंगणी गुरववाडी येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहे. शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेली ही इमारत नागरिकांसाठी आशेचा किरण ठरावी अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ती केवळ कुलूपबंद वास्तू आहे.

ग्रामस्थांना सर्दी-खोकल्यापासून ते लसीकरण, गर्भवतींची काळजी, मुलांची आरोग्य तपासणीसारख्या प्राथमिक सेवांसाठी रोज परगाव गाठावे लागते. पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, पोटाचे आजार, सर्पदंशासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, अशा काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्याने लोकांचा त्रास अधिकच वाढतो.

गावकऱ्यांनी उपकेंद्र उभारण्यासाठी विनामोबदला जमीन दिली, स्वच्छता आणि देखभाल यासाठीही सहकार्य केले; पण उपकेंद्रातील कर्मचारी क्वचितच येतात, येऊनही वेळेपूर्वीच निघून जातात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. रुग्णांना कोणतीही सोय न मिळाल्याने ते वारंवार आरोग्य विभागाला लेखी तक्रारी दिल्या; मात्र कोणतीही सुधारणा झालेली नाही. स्थानिक प्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधत आरोग्याशी खेळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 16/Sep/2025