रत्नागिरी : तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरातून ४ हजार ८१३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १५ हजार ३४५ वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. या अदालतमध्ये एकूण ३ हजार ८५० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. एकूण ७ कोटी ७लाख ७९ हजार ५०९ एवढ्या रकमेची तडजोड झाली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई आदेशानुसार १३ सप्टेंबर २०२५ जिल्हा न्यायालय रत्नागिरी व सर्व तालुका न्यायालय येथे तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती माधव जामदार, उच्च न्यायालय, मुंबई तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते व प्रभारी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विनोद जाधव विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत उद्घाटन करण्यात आले.
लोकअदालतमध्ये जिल्हाभरातून दाखल झालेल्या विविध प्रकरणांपैकी एकूण ३ हजार ८५० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. या अदालतमध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. अदालतमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेशसंबंधित खटले, वैवाहिक वाद आदी प्रकरणांमध्ये तडजोड झाली. लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव आर. आर. पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 16/Sep/2025












