दापोली : दापोली तालुक्यातील जामगे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गोंधळेकरवाडी येथे जिल्हा परिषद मुख्य रस्ता ते वाचनालयाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण काम जनसुविधा या योजनेअंतर्गत २०२३/२४ या वर्षी झाले आहे. या कामासाठी ५ लाख निधी मंजूर होता. मात्र, तरीही ठेकेदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात केला आहे.
मात्र तरीही अभियंता यांनी या दर्जाहीन कामाचे ४ लाख ५ हजार इतके मूल्यमापन केले आहे. याबाबत आता जामगे ग्रामपंचायतीने या कामाचे पुनरावलोकन करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
कामाची चौकशी व्हावी : विलास कदम
५ लाखांचे काम मंजूर असताना ठेकेदाराने या कामाकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्याने कामाचा दर्जा घसरला आहे. सहा महिन्यांत रस्ता पूर्णतः उखडला आहे. मात्र तरीही अभियंता यांनी वस्तूस्थिती बघूनही भरमसाठ बिल ठेकेदारास दिले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे जामगे येथील उपसरपंच विलास कदम यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 16/Sep/2025












