खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील कशेणेजवळ रविवारी (ता. १४) रात्रीच्या सुमारास चालत्या मोटारीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ६ प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ते प्रवासी रत्नागिरीतील आहेत. ही घटना माणगाव पोलिस ठाणे हद्दीत घडली.
याप्रकरणी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मोटारी (एमएच ०८ एएक्स ८९१६) घेऊन चालक मुनाफ मोहम्मद मुकादम (वय ५७, रा. राजिवडा आदमपूर, ता. रत्नागिरी) हे सहा ६ प्रवासी घेऊन मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. माणगाव हद्दीतील कशेणे दरम्यान मोटार आली असता अचानक इंजिनमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले. मोटार चालू असतानाच चालकाला बॉनेटमधून धूर येत असल्याचे लक्षात आले.
मोटारीत बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने प्रसंगावधान राखत मोटार थांबवून सहा प्रवाशांना बाहेर काढले. प्रवासी बाहेर पडताच काही क्षणात इंजिनसह मोटारीने पेट घेतला. सुदैवाने चालकासह सर्व प्रवासी या घटनेत सुखरूप बाहेर पडले होते हा प्रकार समजल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर माणगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त मोटार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 16/Sep/2025














