Mission Lokshahi Abhiyan : गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन लोकशाही’ अभियान

गुहागर : गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन लोकशाही’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील शैक्षणिक चळवळ वाढीस लागावी, संविधान, देशाभिमान याप्रती आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानात भर पडावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या संदर्भात गुहागर शिक्षण विभागाला सूचित केले आहे. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी या अभियानात झोकून देवून काम करावे असे आवाहन भिलारे यांनी केले आहे.

देशाचे संविधान म्हणजे काय, संसदेचे काम कसे चालते, आतापर्यंतचे पंतप्रधान, राष्ट्रपती कोण झाले, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन देशाच्या राजधानीत कसे साजरे केले जातात, यानिमित्त कसे कार्यक्रम होतात यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच देशभक्त, समाजसुधारक यांचे स्वातंत्र्याप्रती असलेले योगदान यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येणार असल्याचे भिलारे यांनी सांगितले.

ही परीक्षा मुख्यतः ४ थी, ५ वी, ६ वी, ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ४ थी, ५ वी हा एक गट आणि ६ वी, ७ वी हा एक गट आणि प्रत्येक गटाकरिता स्वतंत्र पेपर काढला जाईल. परीक्षा एकूण ५० प्रश्नाची असेल व प्रत्येक प्रश्न हा २ गुणांचा असेल. पहिली परीक्षा २६ नोव्हेंबरला केंद्रस्तरावर होईल. पहिली परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक केंद्रातून इयत्ता ४ थी, ५ वी, ६वी, ७वी मधील प्रत्येकी ३ विद्यार्थी निवडले जातील.

एकूण २४० विद्यार्थी तालुकास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरतील. तालुकास्तरीय परीक्षा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. तालुकास्तरीय परीक्षेमधून प्रत्येक इयत्तेमधून प्रत्येकी सहा विद्यार्थी (३ मुले व ३ मुली) निवडले जातील. इयत्ता ४ थी व ५वीच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई व ६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. दिल्ली दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना जाताना विमान प्रवास असून परतीचा प्रवास रेल्वेने होणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी पंचायत समिती सेस फंडातून खर्च केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 16/Sep/2025