गुहागर : झोंबडी ग्रामपंचायतीत अनेक शासकीय योजना राबवताना लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सरपंच अतुल लांजेकर व ग्रामसेवक यांच्यावर त्यांनी ठपका ठेवला आहे. आपण लवकरच सरपंचांविरोधात अविश्वास दर्शक ठराव दाखल करणार असून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. याबाबत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
याबाबत माहिती देताना ग्रामस्थ अक्षय सकपाळ यांनी सांगितले की, डिप फ्रिजरची २५ सप्टेंबर २०२४ ला मागणी केलेली होती. त्याची रक्कम ४० हजार त्याच तारखेला देण्यात आली. मात्र ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत डिप फ्रिजर ग्रामपंचायतीत उपलब्धच नसल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ ला प्रिंटर २०२४ ला खरेदी झाला असून त्याचे बिल ३२ हजार ९१६ रुपये जमा केले आहेत. तरी ८ सप्टेंबर २०२५पर्यंत तो प्रिंटर शाळेला मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
झोंबडी ग्रामदैवत अध्यक्ष समीर तावडे यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी पाणी सुविधा करण्यासाठी ७६ हजार ८१२ रुपये खर्च झाला, परंतु प्रत्यक्ष पाहणी करता केवळ पाण्याची टाकी ठेवली आहे. फोटो मात्र काम पूर्ण झाल्याचा जोडला आहे. झोंबडी शाळा नं. ३ या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग योजना राबविली. त्यासाठी ४४ हजार ७५० रुपये खर्च करण्यात आलेला आहे. पाणी सोडण्यासाठी जो खड्डा मारण्यात आलेला आहे तो योग्य नाही.
चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु : गटविकास अधिकारी
दरम्यान, यावर सरपंच, ग्रामसेवक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुहागर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करुन कोणीही दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 16/Sep/2025












