रत्नागिरी : जिल्ह्यातील आश्रमशाळा व मदरसामध्ये गोवर-रूबेला आजार निर्मूलन करण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत प्राथमिक आरोग्यकेंद्रांच्या समन्वयाने राबवण्यात येणार आहे. यामध्ये ५ ते १५ वयोगटातील सुमारे २ हजार बालकांना ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते. या मोहिमेत आरोग्य विभागाचे पथक सक्रिय असणार रत्नागिरी असून, प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य साहाय्यक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरसेमधील बालकांचे गोवर-रूबेला लसीकरण प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. गोवर-रूबेला लसीकरणाद्वारे १५ टक्क्यापेक्षा जास्त लक्ष्य साध्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध संस्थेतील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शाळेतून १०० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 16/Sep/2025












