रत्नागिरी : जिल्ह्यात महावितरण कार्यालय, कर्मचारी निवासस्थान येथील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील जुने मीटर काढून तेथेही स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. एकूण ६,६७४ शासकीय कार्यालयांपैकी ५,४६७कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित १,२०७ मीटर बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
एकीकडे स्मार्ट मीटर बसविण्यास ग्राहकांचा विरोध होत आहे. तर दुसरीकडे महावितरणने हे मीटर बसविण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. स्मार्ट मीटरमुळे औद्योगिकप्रमाणे घरगुती ग्राहकांना दुपारी वीज दरात ८० पैसे ते एक रुपया दरम्यान सवलत देण्यात येणार आहे.
स्मार्ट मीटरची प्रणाली
सध्या बसविण्यात आलेल्या मीटरचे दरमहा छायाचित्र काढून रीडिंग घेऊन वीज बिल पाठविले जाते. ग्राहकाने ते न भरल्यास कर्मचारी वीजपुरवठा खंडित करतात. स्मार्ट मीटर मात्र नियंत्रण कक्षाशी जोडलेला असल्यामुळे ग्राहकांना विजेचा दररोजचा वापर त्यांच्या मोबाइलवर व अॅपच्या माध्यमातून कळणार आहेत. याचे बिलिंग पोस्टपेड पद्धतीनेच असणार आहे.
शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या महिनाभरात पूर्ण होईल. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या फायद्याचे असून, याची सुरुवात महावितरण कार्यालये, कर्मचारी निवासस्थानापासून करण्यात आली. येथील सर्व मीटर बदलण्यात आले आहेत- सुनीलकुमार माने, अधीक्षक अभियंता, महावितरण
कंपनीकडे देखभाल दुरुस्ती
जुने वीज मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. ठेकेदाराकडून मीटर बसविल्यानंतर दहा वर्षे देखभाल कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांवर खर्चाचा भार राहणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 16/Sep/2025












