खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत हाययर-एज्युकेशन प्रमोशन ब्रिज (HPB) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
यावेळी खेड तालुक्यातील 12 कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. अनिता आवटी यांनी केले. त्यांनी या उपक्रमाची संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट करून सर्वांना या महत्त्वपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली.
या समारंभात मार्गदर्शन करताना ॲड. आनंदराव भोसले म्हणाले की, सहजीवन शिक्षण संस्था कै. हिराचंद उर्फ भाऊ बुटाला यांच्या संस्कारातून कार्यरत आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेने संस्था सतत विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवत आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढेही असे उपक्रम घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा. डॉ. ए.एम. शेख यांनी हाययर-एज्युकेशन प्रमोशन ब्रिज उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत आय.सी.एस. महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक वर्षभर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची जागरूकता निर्माण करणार आहेत. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे कल वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्राचार्य व प्राध्यापकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य विजय मस्के, प्राचार्या सल्वा तिसेकर, प्राचार्य बाळासाहेब भगत, प्रा. अश्फाक अहमद, प्रा. संजय खटके, प्रा. प्रमोद निवळकर व प्रा. भरत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आय.सी.एस. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. डी.एम. शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सी.आर. साळुंखे यांनी केले, तर कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन डॉ. आर.एस. भालेराव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:48 16-09-2025












