दापोली : तालुक्यात माकडांच्या दहशतीने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. इळणे, लोणवडी, माळवी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून माकडांचा उपद्रव सातत्याने वाढत आहे. या माकडांनी गावातील घरांचे कौले काढून अन्नधान्य व कडधान्य उद्ध्वस्त करण्याबरोबरच शेतातील पिकांचा नायनाट केला आहे.
काकडी, चिबूड, पडवळ यासारख्या भाज्यांना फुल येताच माकडं ती खाऊन टाकत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणवडी पंचक्रोशीचे। दिवसापूवाच उपसरपंच तुषार रांगळे यांच्यावर माकडांच्या टोळीने हल्ला केला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर गावकरी घराबाहेर फिरायलाही घाबरू लागले आहेत.
ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
बंदोबस्त न केल्यास कार्यालयावर मोर्चा काढू
जर सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर निर्मल व तंटामुक्ती ग्रुप ग्रामपंचायत तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक मिळून दापोलीतील सरकारी कार्यालयावर मोर्चा काढतील. माकडांचा बंदोबस्त न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 16/Sep/2025












