Ratnagiri : जिल्ह्यात ४६१ नौकांच्या सुनावण्या प्रलंबित

रत्नागिरी : अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने ड्रोनच्या साह्याने गस्त सुरू केली. मागील हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात ५६३ मासेमारी नौकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यातील १०२ नौकांवर सुनावणीनंतर दंड आकारण्यात आला; मात्र पुढील हंगाम सुरू झाला असून, अजूनही मागील ४६१ नौकांवरील सुनावण्या प्रलंबित आहेत.

मत्स्य व्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी अवैध मासेमारीसंदर्भात कडक भूमिका घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाची यंत्रणा कामाला लागली. ९ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या किनारपट्टीवर अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, नाटे येथे ड्रोन केंद्र करण्यात आली होती. किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांचे अंतर इतकी एका ‘ड्रोन’ची कार्यकक्षा आहे. मागील हंगामात जानेवारी ते ३१ मे २०२४ या कालावधीत ड्रोनच्या कार्यकक्षात एक हजाराहून अधिक मच्छीमारी नौका आल्या होत्या. त्यातील ५६४ नौका मासेमारी करताना आढळल्या होत्या. त्यात परप्रांतीय ३४ नौकांचा समावेश आहे. या नौकांवर साहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे सुनावण्या घेण्यात आल्या. जून ते सप्टेंबर या कालावधीत १०२ नौकांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या. अवैध मासेमारी केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर ३७ लाख ५७ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील १७ लाख ९२ हजारांची वसुली झाली आहे. अजून २० लाखांची वसुली शिल्लक आहे.

तसेच दंडात्मक कारवाईसाठी ४६१ नौकांच्या सुनावण्या घेणे शिल्लक आहे. अवैध मासेमारी करणाऱ्यांवर दंड आकारला तर चालू हंगामात त्यांना आळा बसेल अन्यथा त्या नौका पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात रवाना होतील. ड्रोनची कारवाई फक्त सुनावणीपुरतीच राहील.

मासेमारीचे निकष
महाराष्ट्राच्या १२ सागरी मैल क्षेत्र हे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्ससीन मच्छीमार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी वगळता मासेमारी करू शकत नाही. मुरूड ते बुरोंडी परिसरादरम्यान १० मीटरच्या खोलीच्या पलीकडे, बुरोंडी ते जयगडच्या परिसरात २० मीटर खोलीच्या पलीकडे आणि जयगड ते बांदा दरम्यानच्या परिसरात २५ मीटर खोलीच्या पलीकडे पर्ससीन नौकांना मासेमारी करण्याला परवानगी आहे याशिवाय एलईडी प्रकाशदिव्यांचा वापर करून आणि हायड्रॉलिक विंच म्हणजेच बूम विंच वापरून मासेमारी करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:59 PM 16/Sep/2025