दाभोळे येथे भरधाव ट्रक घुसला किराणा दुकानात

साखरपा : मिऱ्या- नागपूर महामार्गावर साखरपानजीक दाभोळे येथील पुलावर ट्रकला झालेल्या अपघातात किराणा दुकानाचे नुकसान झाले आहे. अपघात (ता. १५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चौदाचाकी ट्रक सोमवारी रात्री रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. हा ट्रक दाभोळेजवळ आला असता समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी चालकाने ट्रक डाव्या बाजूला घेतला. त्याचवेळी ट्रक रस्त्याकडेच्या कठड्याला धडकला. ट्रक वेगात असल्यामुळे धडक इतकी जोरदार होती की, संपूर्ण कठडा तुटून गेला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रकची पुढील चार चाके निखळली असून, चालक केबिनचेही नुकसान झाले आहे. वेगात असलेला ट्रक पुलाजवळील राजेश चिंगळे यांच्या किराणा दुकानात शिरला. सुदैवाने, तिथे कोणीच नसल्याने अनर्थ टळला; मात्र ट्रकच्या धडकेत दुकानाच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे. दाभोळे पूल हा ब्रिटिशकालीन असल्यामुळे आता तो वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. या पुलावरून अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे नवीन महामार्गावरील पूल तातडीने व्हावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 17/Sep/2025