Ratnagiri : पतीच्या मोबाईलवर मुलींचे नंबर मिळाल्याच्या रागातून वाद; पत्नीला बेदम मारहाण

रत्नागिरी : पतीच्या मोबाईलवर काही मुलींचे नंबर मिळाल्याच्या रागातून झालेल्या वादातून पत्नीला पती आणि सासूने बेदम मारहाण केली. ही घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वा. सुमारास गयाळवाडी येथे घडली. पती श्वेतांग प्रदीप वायंगणकर (३१) आणि सासू प्रार्थना प्रदीप वायंगणकर (५८, दोन्ही रा. विनायक बंगला गयाळवाडी, रत्नागिरी) या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्या विरोधात पत्नी निधा श्वेतांग वायंगणकर (२७) हिने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी पत्नी निधा ही पती श्वेतांगचा मोबाईल चेक करत होती. त्यावेळी तिला मोबाईलमध्ये काही मुलींचे फोन नंबर मिळून आले. यातून पती-पत्नींमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर पत्नी निधा ही घराजवळील वडापावच्या गाडीजवळ असताना त्यांच्यातील वादाचा राग मनात धरुन पती श्वेतांगने त्याठिकाणी जाऊन निधाला लोखंडी साखळीने हातांवर, पायांवर पाठीवर मारहाण केली.

त्यानंतर निधाची सासू प्रार्थना हिने त्याठिकाणी येऊन लाकडी बांबूने सुनेला दोन्ही हातांवर, पायांवर पाठीवर मारहाण केली तसेच पती श्वेतांगने पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पती आणि सासू विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 22/Sep/2025

Yash siddhi2