रत्नागिरी : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त खारेघाट रोडवरील कार्यालय व जेलरोड एक्सचेंज येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातून बीएसएनएल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यात नवीन १८८ मोबाईल टॉवर्सच्या उभारणीचे काम चालू आहे याअंतर्गत बीएसएनएलची आत्तापर्यंतची प्रगती व देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देण्यात आली.
२७ सप्टेंबर रोजी बीएसएनएलच्या 4G सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला सत्यात उतरविण्याच्या दृष्टिकोनातून “बीएसएनएल”ने आपल्या स्वदेशी 4G मोबाईल तंत्रज्ञानाची उभारणी केली आहे. बीएसएनएलने भारतामध्ये ९७ हजार ६०० मोबाईल टॉवर्स या स्वदेशी तंत्रज्ञानाने कार्यान्वित केलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात नवीन १८८ मोबाईल टॉवर्सच्या उभारणीचे काम चालू आहे. त्याचबरोबर भारत हा टेलिकॉम क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनणारा जगातील पाचवा देश बनला आहे. हे नवीन 4G तंत्रज्ञान भारतातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना संवाद व इंटरनेट सेवा या दोन्हीचा वापर करण्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन “बीएसएनएल” तर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 03/Oct/2025














