Sunil Tatkare | कॅलिफोर्नियालाही वाटेल कोकण बनावं : खासदार सुनील तटकरे

मंडणगड : एकेकाळी आम्ही स्वप्न बघितले होते की, कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा, आता कोकणातील सागरी महामार्ग जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा कॅलिफोर्नियालाही वाटेल की कोकण बनावं या पद्धतीने विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.

यावेळी मंडणगड तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत अग्रक्रम देवून येथील विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. उद्याच्या भवितव्याची वाटचाल करत असताना कोकणचा विकास हाच आपला ध्यास असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

तालुक्यातील भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या राज्याचा ५०वा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान राज्याचा अर्थमंत्री असताना जेंव्हा मला मिळाला तेव्हा त्या अर्थसंकल्पात तालुक्यातील बाणकोट ते बागमांडला पुलासाठी प्राधान्यक्रमाने मंजुरी देण्याचा निर्णय मी घेतला. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचे स्वप्न पाहिले, त्या मार्गावरील बाणकोट ते बागमांडला या पुलासाठी २५० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करून या पुलाला मंजुरी दिली. पुन्हा एकदा नव्याने या कोकण सागरी महामार्गाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे, या सागरी मार्गासाठी आपला सातत्याने पुढाकार असून एमएसआरडीसी मार्फत या मार्गावरील नऊ पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे. आगामी कालावधीमध्ये लवकरच हा सागरी महामार्ग होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

लोकहिताचे व महत्वाचे विषय व समस्यांचा प्राधान्याने विचार करुन तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार सुनील तटकरे काम करीत आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावे त्यांना सोईच्या ठिकाणी कमी अंतराने जोडली गेली आहेत. या रस्त्यांमुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला गती येईल, असेही तटकरे म्हणाले.

सभेनंतर खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अडखळ व आतखोल या गावांतील मंजूर प्रधानमंत्री सडक योजनेतील दोन कामांचे भूमिपुजन झाले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, प्रकाश शिगवण, साधना बोत्रे, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सतू कदम, रमा बेलोसे, नेहा जाधव, आदिती आमरे, समद मांडलेकर, शाहजान हारविटकर, नगराध्यक्षा सोनेल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, रेश्मा मर्चेंडे, प्रियांका लेंडे, सुभाष सापटे, दीनेश लेंडे, पैरोज उकये, राकेश साळुंखे, लुकमान चिखलकर, हरेष मर्चेंडे, सालेम सय्यद, गणेश सावर्डेकर, हसरत खोपटकर, भावेश लाखण आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 09/Oct/2025