शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभे करू : अशोक वालम

गुहागर : शेतकऱ्यांशी संपर्क साधून किती नुकसान झाले आहे, याची माहिती आम्ही घेत आहोत. या माहितीच्या आधारे पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. त्यांनी दखल घेतली नाही, तर शेतकऱ्यांसाठी बळीराजा सेनेच्यावतीने मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक वालम यांनी दिला आहे.

(ता. ५) गुहागर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या कोकणात पडतोय तो अवकाळी पाऊस नसून हा वाढीव पाऊस आहे. या पावसाने कोकणातील असलेली भातशेती, नाचणी, वरी यांसह इतर पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज डिसेंबरपर्यंत दिल्याने आंबा, काजू हे पीकही नष्ट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आजपर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही; पण यानंतर जर शासनाने लक्ष दिले नाही, तर मात्र शेतकऱ्यांवर नक्की आत्त्महत्या करण्याची परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी इथले राजकारणीच जबाबदार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भमराठवाडा येथील शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू किंवा अनेक नेते आंदोलन उभे करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत आहेत. त्याचा काहीही फायदा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना होणार नाही. इकडच्या लोकप्रतिनिधींनी मग ते आमदार, खासदार, पालकमंत्री असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे होती. त्यांनी स्वतःहून यासाठी नियोजन केले पाहिजे होते; पण कोण करत नाही?, असा आरोपही त्यांनी केला.

जिल्हाप्रमुख पराग कांबळे, सरचिटणीस संभाजी काजरेकर, शामराव पेजे महामंडळ अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, विधानसभा संपर्कप्रमुख शरद बोबले, सहसंपर्कप्रमुख मनोहर घुमे, अमित काताळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, महिला आघाडी अध्यक्ष श्रावणी शिंदे, महिला आघाडीप्रमुख ऐश्वर्या कातकर, सचिव स्वप्नाली डावल, तालुका सचिव श्वेतांबरी मोहिते, लोटे विभागप्रमुख सुभाष हुमणे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, युवक अध्यक्ष विवेक जांगली, तृप्ती शिगवण, गजानन मांडवकर, विनायक घाणेकर, नामदेव अवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 07/Nov/2025