गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील पर्यटक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच तर अन्य दोघा तरुणांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यावसायिक, जीवरक्षक, पोलिस व ग्रामस्थांना यश आले आहे.
प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय २६, राहणार मानखुर्द, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तसेच भीमराज आगाळे (वय २४, रा. कल्याण, मुंबई) आणि विवेक शेलार (वय २५, रा. विद्याविहार, मुंबई) हे दोन तरुण बचावले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल त्रिमुखी, सिद्धेश काजवे (रा. परेल लालबाग, मुंबई), भीमराज आगाळे, विवेक शेलार व अन्य दोघे असे कॉलेजचे मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले होते. हे पाच तरुण गणपतीपुळे येथे एका खासगी लॉजमध्ये निवासासाठी उतरले होते. यावेळी या तरुणांनी दुपारनंतर समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचे ठरवले व ते आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी समुद्रस्नान करण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला, असता ते बुडू लागले.
यावेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषीत केले. तसेच भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना चांगल्याप्रकारे शुद्धीवर आणून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याचे शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी सांगितले. तसेच मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी याच्या कुटुंबियांना सदर घटनेबाबत कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 AM 08/Nov/2025












