रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी नगरपरिषदेतील डांबर खरेदी आणि रस्ते कामांमध्ये ४४ कोटी ६९ लाखांच्या गैरव्यवहाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बाळ माने यांनी केलेला आरोप, पालकमंत्री उदय सामंत यांनी “पोकळ” आणि “राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे म्हणत फेटाळून लावला आहे. “हीच टेप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वाजली होती, आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ती वाजवली जात आहे,” अशा शब्दांत सामंत यांनी या आरोपांची खिल्ली उडवली.
बाळ माने यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना पालकमंत्री सामंत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

ते म्हणाले, “माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने ही ‘आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ कंपनी उभी केली आहे. या कंपनीचे नाव केवळ कोकणातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात नावाजलेले आहे. त्यामुळे अशा पोकळ आरोपांनी माझ्यावर, आमच्या व्यवसायावर किंवा माझ्या वडिलांच्या कष्टावर कोणताही परिणाम होणार नाही.”
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप होणे अपेक्षितच होते, असा सूर लावत सामंत यांनी या आरोपांमधील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. माने यांनी केलेल्या आरोपांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काय होते बाळ माने यांचे आरोप?
तत्पूर्वी, शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी रत्नागिरी नगरपरिषदेत २०१४ ते २०२३ या कालावधीत ‘सामंत कन्स्ट्रक्शन’ कंपनीला दिलेल्या कामांवर आक्षेप घेतला होता. माहितीच्या अधिकाराचा दाखला देत, सुमारे ११४ कोटी ८२ लाखांच्या कामांपैकी ४४ कोटी ६९ लाखांची देयके चलन सादर न करताच अदा केल्याचा गंभीर आरोप माने यांनी केला होता. तसेच, उदय सामंत यांनी पालकमंत्री पदाचा गैरवापर करून हा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत, या प्रकरणाची सीबीआय, ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणीही त्यांनी केली होती.
मात्र, उदय सामंत यांनी या सर्व आरोपांना “जुनीच टेप” संबोधत ते पूर्णपणे धुडकावून लावले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 08/Nov/2025












