‘हिंदी सक्ती’ हा उत्तर भारतीयांना खुश करण्याचा डाव; मुंबई ‘MMR प्रांत’ करून वेगळी करण्याचा घाट – डॉ. दीपक पवारांचा रत्नागिरीत घणाघात

रत्नागिरी: “राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती (Hindi Compulsion) करणे हा केवळ भाषिक प्रश्न नसून, हा ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’चा अजेंडा राबवण्याचा आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीय व जैन मतदारांना खुश करण्याचा राजकीय डाव आहे,” असा घणाघाती आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार (Dr. Deepak Pawar) यांनी आज रत्नागिरीत केला. “मुंबई शहराला ‘एमएमआर प्रांत’ (MMR Prant) संबोधून, महाराष्ट्रापासून तोडण्याचे आणि त्याचे ‘नगरराज्य’ (City-State) बनवण्याचे एक सुनियोजित कारस्थान सुरू आहे,” असा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मराठी भाषा, संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेले डॉ. दीपक पवार हे हिंदी सक्तीविरोधातील प्रबोधन दौऱ्यानिमित्त आज रत्नागिरीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आणि नरेंद्र जाधव समितीवर (Narendra Jadhav Committee) जोरदार हल्ला चढवला.

नरेंद्र जाधव समितीवर घणाघात
डॉ. पवार म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून नरेंद्र जाधव समिती महाराष्ट्रात फिरत आहे. ९०% लोकांचा हिंदीला विरोध आहे, हे वास्तव त्यांना आता सरकारच्या खर्चाने ‘पर्यटन’ करून कळले आहे. हीच गोष्ट आम्ही एप्रिल-जून महिन्यापासून रस्त्यावर उतरून सांगत होतो. आता ते २० डिसेंबरला अहवाल देणार आहेत. जर त्या अहवालात तिसऱ्या भाषेचा आग्रह धरला, तर आम्ही जशी शासन निर्णयांची होळी केली, तशीच नरेंद्र जाधवांच्या अहवालाचीही होळी करू.”

जाधवांच्या हेतूवर शंका उपस्थित करताना ते म्हणाले, “सुरुवातीला त्यांना वाटले असेल की एक चांगला अहवाल देऊन महाराष्ट्र भूषण किंवा एखाद्या छोट्या राज्याचे राज्यपाल पद मिळवता येईल, पण आता ही कल्पना त्यांच्याच अंगलट आली आहे.”

सीबीएससी शाळांमधूनही हिंदी काढून टाका”
पवार यांनी शाळांच्या राजकारणावरही बोट ठेवले. ते म्हणाले, “गेल्या १०-१५ वर्षांत स्वयं-अर्थसहाय्यित शाळांचे पेव फुटले आहे. यातील ८०% पेक्षा जास्त शाळा इंग्रजी माध्यमाच्या (CBSE/ICSE) आहेत. हा एक ‘न्यू लिबरल’ व्यवहार झाला आहे. या शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकवले जाते. आता ‘इक्वलायझेशन’च्या नावाखाली एसएससी बोर्डावर (SSC Board) हिंदी लादली जात आहे.”

“जर सरकारला समानताच करायची असेल, तर आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील सीबीएससी शाळांमधूनही हिंदी काढून टाका. तिथेही फक्त इंग्रजी आणि मराठी या दोनच भाषा शिकवा. उत्तर भारतात सीबीएससी शाळा हिंदी माध्यमाची असू शकते, तर महाराष्ट्रात मराठी माध्यमाची का असू शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“खरा हेतू मतांचे तुष्टीकरण”
डॉ. पवारांनी या हिंदी सक्तीमागील खरा राजकीय हेतू स्पष्ट केला. “सरकारला माहिती आहे की मराठी माणूस महानगरपालिका निवडणुकीत त्यांना मत देणार नाही. त्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन मतदारांना खुश करण्यासाठी हे सर्व सुरू आहे.”

त्यांनी उदाहरणे देत सांगितले:

मुंबईत गणपतीच्या निर्माल्य कुंडांपेक्षा जास्त कुंड छटपूजेसाठी उभारली जातात.

‘उत्तर भारतीय सेने’चा एक नेता ‘सनातनी’ लोकांना बंदुकीचे लायसन्स आणि मनपा निवडणुकीत तिकीट देण्याची भाषा करतो.

जैन समाजाच्या दबावामुळे कबुतरांसाठी जेवढी गर्दी होते, तेवढी मराठी शाळा पाडल्या जात असताना होत नाही.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव”
डॉ. पवारांनी मुंबई आणि एमएमआर प्रदेशाबाबत सर्वात गंभीर आणि स्फोटक दावा केला. ते म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री मुंबईचा उल्लेख ‘शहर’ असा न करता ‘एमएमआर प्रांत’ असा करतात. अटल सेतू जिथे संपतो, तिथेच अंबानींची ५००० एकर जमीन कशी असते? हा योगायोग नाही. एस. के. पाटील आणि मोरारजी देसाई यांचे जे स्वप्न होते, तेच स्वप्न (मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करणे) आता पूर्ण केले जात आहे.”

“एमएमआर प्रांतात उत्तर भारतीयांचे इतके स्थलांतर झाले आहे की, तिथे हिंदी हीच पहिली भाषा होत आहे. गुजर-मारवाड्यांकडे पैसा आहे आणि उत्तर भारतीयांकडे लोकसंख्या आहे. मराठी माणूस एकतर वंचित आहे किंवा स्वतःला विकायला तयार आहे. जर एमएमआर वेगळा झाला, तर विदर्भही वेगळा होईल आणि महाराष्ट्राचे तुकडे होतील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

कोकणाला इशारा: “आम्ही जात्यात, तुम्ही सुपात”
मुंबईत जे घडते आहे, तेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही घडेल, असा इशारा पवारांनी कोकणवासीयांना दिला. “कृपाशंकर सिंह रत्नागिरी-सिंधुदुर्गात येऊन शेतकरी कसा होतो? कणकवली, कुडाळच्या बाजारपेठांमध्ये गुजर-मारवाडी कसे वाढतायत? आपलेच लोक त्यांना जमिनी विकत आहेत. आपण ‘धर्माच्या भुता’मुळे आणि मुसलमानांची वाजवण्याच्या नादात भाषेचा मुख्य धोका विसरलो आहोत.”

“आज आम्ही मुंबईकर ‘जात्यात’ आहोत, तुम्ही कोकणवासीय ‘सुपात’ आहात. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातला मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन हासुद्धा मराठीच आहे. हमीद दलवाई हे माझ्याइतकेच मराठी होते. जर मराठी शाळा टिकल्या नाहीत, तर मराठी भाषा, मराठी वर्तमानपत्रे आणि मराठी माणूसही टिकणार नाही. त्यामुळे सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे,” असे कळकळीचे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 13/Nov/2025