रत्नागिरी: आगामी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तळ ठोकला आहे. आज रत्नागिरीतील विवेक हॉटेल येथे पार पडलेल्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याबाबत अत्यंत रोखठोक भूमिका मांडत कार्यकर्त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
“राजेश सावंत आता पार्टीचा भाग नाहीत”
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या मुलीच्या (उबाठा गटातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी) राजकीय कारकीर्दीसाठी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सावंत हे रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, आजच्या मेळाव्यात बोलताना चव्हाण यांनी मैत्री आणि पक्षनिष्ठा यातील फरक स्पष्ट केला.
रवींद्र चव्हाण म्हणाले, “कार्यकर्ता म्हणून मी सर्वांना विनंती करतो, राजेश सावंत मित्र म्हणून ठीक आहेत, पण आता ते ‘पार्टीचा कोणताही भाग नाहीत’, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. ते व्हॉट्सॲप स्टेटसवर काय ठेवतात, याकडे लक्ष देऊ नका. हे सर्व आता विसरले पाहिजे. सध्या सचिन वहाळकर आणि दीपक पटवर्धन काय सांगतायत, हेच कार्यकर्त्यांनी पाहिले पाहिजे.”
नात्यात अडकू नका, महायुतीचा धर्म पाळा
कार्यकर्त्यांना संबोधित करताना चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “पक्षाने आपल्याला काय दिले? किती मोठा सन्मान दिला? हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे एकदा वरून निर्णय झाला की महायुती म्हणून लढायचे, तर मनात कोणताही ‘किंतु-परंतु’ न ठेवता काम केले पाहिजे. नात्यात अडकून राहिलो तर मोठी गडबड होऊ शकते. त्यामुळे तुमचे आणि आमचे नाते केवळ ‘महायुती’ हेच आहे.”
बंडखोरांनी तात्काळ अर्ज मागे घ्यावेत
महायुतीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून अधिकृत उमेदवारां विरोधात अर्ज भरले आहेत, त्यांना चव्हाण यांनी कडक शब्दात समज दिली. “बंडखोरांशी प्रमुखांनी चर्चा करावी आणि तात्काळ त्यांचे अर्ज मागे घ्यावेत. प्रत्येक प्रभागात आणि नगराध्यक्षपदासाठी युतीचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा,” असे आवाहन त्यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील एका विचाराचे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही येणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.














