गुहागर : आयुष्यात जर यश मिळवायचे असेल तर कधीही कोणाशी स्पर्धा करू नका तर ती स्पर्धा स्वतःशीच करा. स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास ठेवा, यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले. बळीवंश फाउंडेशन गुहागर संचलित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सामजिक कार्यकर्ते संतोष जैतापकर, श्री. वैद्य, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, पांडुरंग पाते, मुख्याध्यापक श्री. गोरीवले, भालचंद्र जोगळे, स्नेहा भागडे, संतोष घुमे, संतोष सोलकर, अपूर्वा बारगोडे, दिलीप डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भिलारे यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा हा रत्नांची खाण आहे. त्यामुळे इथल्या मातीतून मोठ-मोठे अधिकारी झाले पाहिजेत. स्वतः ला कधीच कमी लेखू नका. या ठिकाणच्या विद्यार्थ्यामध्ये खूप प्रतिभा आहे. म्हणूनच येथील विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यावेळी बळीवंश फाउंडेशनच्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
बळीवंश फाऊंडेशन गुहागर संचलित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्पर्धा परीक्षा वाचनालयाच्या माध्यमातून तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याचा विद्यार्थी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीवंश फाऊंडेशनचे सचिव नितीन पागडे, प्रास्ताविक प्रमोद गोणबरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष संतोष सोलकर यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 29/Nov/2025














