रत्नागिरीत ‘पत्रक’ युद्धाचा भडका! राजेश सावंतांच्या आरोपांना महायुतीचे चोख उत्तर; बोगस पत्रकाबाबत थेट पोलिसात तक्रार

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी महायुतीवर आणि विकासकामांवर टीका केली होती. या टीकेला आज महायुतीने पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिले आहे. “महायुतीला बदनाम करण्यासाठी बोगस पत्रके वाटली जात असून, त्याबाबत आम्ही आजच पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत,” असा खळबळजनक दावा शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे बाबू म्हाप, बिपीन बंदरकर तसेच भाजपचे दीपक पटवर्धन आणि सचिन वहाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बोगस पत्रकाचा ‘मास्टरमाइंड’ कोण?

राजेश सावंत यांनी काल पत्रकाचा मुद्दा उपस्थित करत काही ठिकाणी नेत्यांचे फोटो नसलेली पत्रके वाटल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना बिपीन बंदरकर यांनी राजेश सावंतांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “आमच्या अधिकृत पत्रकावर (उदा. प्रभाग ४) सर्व वरिष्ठ नेत्यांचे फोटो आहेत. सावंत यांनी दाखवलेले पत्रक आम्ही वाटलेले नाही. उलट महायुतीला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी किंवा खुद्द तक्रार करणाऱ्यांनीच (सावंत) ही बोगस पत्रके छापून वाटली असावीत, असा आमचा संशय आहे. या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली असून, आमच्या नावाने बोगस पत्रके कोण वाटत आहे, याचा शोध घेण्यासाठी आम्ही आजच रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आहोत.”

विकासकामांचा पाढा आणि खड्ड्यांचे वास्तव

शहरातील विकासकामांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना महायुतीने मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची यादीच वाचून दाखवली.

  • तारांगण प्रकल्प
  • छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा
  • भगवती बंदरातील शिवसृष्टी
  • थिबा पॅलेसचे नूतनीकरण आणि ३डी मल्टिमीडिया शो
  • नाट्यगृहाचे नूतनीकरण

रस्त्यांबाबत स्पष्टीकरण: विरोधक केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून ओरडत आहेत. मात्र, गेले सहा महिने सतत पाऊस सुरू असल्याने डांबरीकरण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. आता पाऊस थांबला असून रस्त्यांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. येत्या दीड-दोन महिन्यांत सर्व रस्ते चकाचक होतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

“विरोधकांचा सुपडा साफ होणार; ३२ च्या ३२ जागा जिंकणार”

महायुतीमध्ये कोणतीही बिघाडी नसून युती अभेद्य असल्याचा पुनरुच्चार नेत्यांनी केला. उलट विरोधकांमध्येच फूट पडली असून, उबाठा गट आणि तुतारी वेगळे लढत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. बिपीन बंदरकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटले की, “विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे या तब्बल १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच पालिकेच्या ३२ पैकी ३२ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. समोरच्या विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.”

झोपडपट्टीवासीयांसाठी महत्त्वाचा निर्णय

रत्नागिरी शहरातील झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर आणि पुनर्वसन करण्यासाठी आयटीआय (ITI) समोरील जागा निश्चित करण्यात आली असून, लवकरच सुमारे १००० घरांचा प्रकल्प तिथे साकारण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

बाळ मानेंवर निशाणा

विरोधक बाळ माने हे सतत उदय सामंत यांना टार्गेट का करतात? या प्रश्नावर उत्तर देताना बंदरकर म्हणाले, “उदय सामंत यांनी प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे आणि ते कामात सरस आहेत. त्यामुळे विरोधकांकडे सामंत साहेबांवर टीका करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.”