रत्नागिरी : रत्नागिरी विभागात २०२५ यावर्षी चालकांकडून एसटी बसेस चालवल्या. मात्र, काहींनी निष्काळजीपणामुळे तर ब्रेकफेल, टायर फुटल्यामुळे, काही रस्त्यांच्या कामामुळे, तांत्रिक कारणामुळे एसटी अपघात झाले. २०२४ व २०२५ या दोन वर्षांत किरकोळ, गंभीर, प्राणांतिक मिळून ३५५ एसटी अपघात झाले असून त्यामध्ये १९५ गंभीर अपघात आहेत, तर २०२५ यावर्षी रत्नागिरी विभागात १८२ एसटी अपघात झाले आहेत. त्यामध्ये ९९ अपघात गंभीर, ७६ किरकोळ तर उर्वरित सात अपघात प्राणांतिक आहेत. एसटीकडून दरवर्षी सुरक्षा अभियान घेऊनही एसटी अपघातात वाढ होत आहे.
राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करण्यात येते. सेवापूर्व प्रशिक्षण ४८ दिवसांचे असते. उजळणी प्रशिक्षण तसेच ज्या चालकांच्या हातून अपघात झाला आहे, अशा चालकांना तत्काळ ११ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. शिवशाही चालकांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने चालकांची वैद्यकीय व नेत्रतपासणी केली जाते. ४० वर्षांच्या आतील चालकांची वर्षातून एकदा तर ४० वर्षांवरील चालकांची दरवर्षी तपासणी केली जाते. या शिवाय त्यांचे कौन्सिलिंगही करण्यात येते.
दरम्यान, महा प्राशन करून चालकाच्या हातातून अपघात होऊ नये, यासाठी चालकाची अल्कोहोल टेस्टही केली जाते. त्यासाठी प्रत्येक आगारासाठी अल्कोहोल टेस्ट चाचणीचे मशिनही देण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे कित्येक वेळा एसटी डिव्हायडर, डोंगराला, झाडाला आदळली आहे. कित्येकवेळा शहरातील कित्येक भागांत एसटी पलटली आहे. उपाययोजना करूनही एसटीच्या अपघाताची संख्या घटण्याऐवजी संख्या वाढत आहे.
२०२५ मध्ये गंभीर अपघात संख्येत वाढ
रत्नागिरी विभागात २०२४ यावर्षी १७३ एसटीचे अपघात झाले होते. तर २०२५ मध्ये वाचे प्रमाण १८२ वर गेले आहे. किरकोळ, प्राणांतिक अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी गंभीर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मद्य प्राशन करून एसटी चालवणाऱ्यांवर कारवाई हवीच
नुकतेच एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्वच चालक, वाहकांची मद्यप्राशन केले का नाही, याची पाहणी केली होती. यामध्ये कित्येक कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. त्यामुळे येणाऱ्या एसटी बसेसमध्ये आता ‘ब्रेथ अनायझर’ बसवण्यात येणार आहे. रत्नागिरी विभागात ही चालक मद्य प्राशन करून एसटी चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. मंडणगडात तर ५० फूट एसटी बस खाली गेली होती. गुहागर, चिपळूणमध्ये चालक, वाहकांनी मद्य प्राशन केल्याचे व्हिडीओ प्रसारित झाले होते. गुन्हा दाखल झाला; मात्र एसटी विभागाच्या वतीने काय कारवाई झाली, अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मद्यपी चालक, वाहकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 PM 06/Jan/2026














