Ratnagiri : आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी : बदलत्या हवामानामुळे आंबा बागांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव याविषयी कृषी विभाग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी व आंबा उत्पादक यांच्यासोबत ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली होती. यापुढे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही कार्यशाळा होणार आहे.

या ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक उपसंचालक डॉ. जालगावकर, भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे, कृषी विद्यापीठाचे कीटकनाशस्त्रज्ञ डॉ. मुळे व वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ पोटफोडे उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना आंबा मोहर संरक्षण तसेच आंबा फुलकिड व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले.

दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी होणाऱ्या कार्यशाळेची लिंक सहभागी बागायतदारांना पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी सेवक, सहायक कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 06/Jan/2026