‘अन्नपूर्णा २ एम ‘ देणार ग्रामीण भागातील वीस लाख जणांना आरोग्य सेवा

रत्नागिरी:  देशातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी अन्नपूर्णा २एम: सामूहिक फिरती आरोग्यसेवा (कम्युनिटी मोबाइल हेल्थकेअर) हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून इ. स. २०३० पर्यंत २० लाख लोकांना सेवा देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यात महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. वनस्टेज या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कोर्टेव्हा अॅग्रीसायन्स आणि दीपक फाऊंडेशन यांनी हे पाऊल उचलले आहे.
या प्रकल्पाची सुरूवात नुकतीच एका सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आली. खेड तालुक्यातील पीर लोटे येथील ग्राम पंचायत सभागृहात हा कार्यक्रम झाला. कोर्टेव्हा अॅग्रीसायन्स, वनस्टेजचे वरिष्ठ अधिकारी तसेच सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधला व त्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती करून घेतली. यावेळी परिसरातील गावकरीही ५०० पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोर्टेव्हा अॅग्रीसायन्सचे प्रतिनिधी म्हणाले, “संपूर्ण भारतात मर्यादित खाजगी किंवा सरकारी रुग्णालयांची सेवा असलेल्या भागांमध्ये गंभीर आरोग्य सेवा देण्यासाठी जवळपास  २५,००० प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) स्थापन करण्यात आली आहेत. मात्र देशाच्या दुर्गम व ग्रामीण भागांमध्ये या सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. ग्रामीण भारतामधील आरोग्य सेवेतील ही गंभीर तफावत दूर करण्याच्या उद्देशाने “अन्नपूर्णा २एम: कम्युनिटी मोबाइल हेल्थकेअर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सुसज्ज मोबाईल हेल्थ युनिट्सच्या (एमएचयू) माध्यमातून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील.”

“ग्रामीण भागातील तातडीच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारणांना चालना देण्यासाठी हा उपक्रम आहे. रुग्णांची संख्या, आरोग्य निकषांमधील सुधारणा आणि गंभीर आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता यावरून या उपक्रमाचे यश मोजण्यात येईल,” असे त्यांनी पुढे सांगितले.


दीपक फाऊंडेशनचे प्रतिनिधी म्हणाले,  “ग्रामीण भारतातील आरोग्य सेवेतील दरी कमी करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक महत्त्वाचे  पाऊल आहे. आमचे कौशल्य आणि कोर्टेव्हाचा पाठिंवा यांना एकत्र आणून ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत अत्यावश्यक आरोग्य सेवा आम्ही वितरित करू शकू, यावर आमचा विश्वास आहे.”


वनस्टेजच्या वरिष्ठ व्यवस्थापक पारुल राठौर म्हणाल्या, “सामाजिक-आर्थिक बदलांना गती देणाऱ्या सहयोगी दृष्टिकोनावर विश्वास बाळगण्यासाठी वनस्टेज कटिबद्ध आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी उपाय विकसित करण्यासाठी कोर्टेव्हा, वनस्टेज आणि दीपक फाउंडेशन यांनी सहकार्य केले. मोबाईल हेल्थ क्लिनिक्सचा प्रकल्प हा ग्रामीण लोकसंख्येच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. विशेषत: महिलांच्या बाबतीत.”


या प्रत्येक एमएचयूमध्ये पात्रताधारक वैद्यकीय व्यावसायिकांची नियुक्ती केली जाईल. तसेच ते निदानासाठी आवश्यक साधने आणि औषधांनी सुसज्ज असतील. यामुळे लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळतील, याची हमी मिळेल. याशिवाय, या उपक्रमातून ग्रामीण लोकांना प्रचलित आरोग्य समस्यांबद्दल आणि गैर-संसर्गजन्य रोग, संसर्गजन्य रोग आणि सामान्य निरोगीपणा यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागृत करण्यात येईल.

 
रत्नागिरीच्या खेड मधील १६ गावांमध्ये प्रत्यक्ष आरोग्यसेवा पुरवून वैद्यकीय सेवांची उणीव भरून काढण्याचे “कम्युनिटी मोबाईल हेल्थकेअर” प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील ८ महिन्यांत सहा राज्यांतील  १२५,००० रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल. यामध्ये रत्नागिरी (महाराष्ट्र), वडोदरा (गुजरात), चिक्कबल्लापूर (कर्नाटक), मेडचल आणि सिद्धीपेट (तेलंगणा) आणि पूर्व गोदावरी (आंध्र प्रदेश) यांचा समावेश आहे. यामध्ये अॅनिमिया, मातांचे आरोग्य आणि प्रजनन आरोग्य यांसह महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. “कम्युनिटी मोबाईल हेल्थकेअर” उपक्रमामध्ये स्थानिक नेते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.