राजापुरात शिकारीसाठी फिरणाऱ्या दोघांना बंदुकीसह घेतले ताब्यात

राजापूर : राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलालगत जंगलमय भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना बंदुकीसह नाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सिंगल बॅरल बंदूक, दोन जिवंत काडतुसांसह सुमारे 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला सकाळी 6.15 वाजता दर्शन दशरथ तांबे (22) आणि प्रशांत सहदेव धरमकर (36) हे दोघे दांडे अणसुरे पुलाच्या पुढे जंगलमय भागात शिकार करण्याच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक, दोन जिवंत काडतुसांसह आढळले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी दोघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी 50 हजार रुपयांची सिंगल लोखंडी बॅरल 12 बोअर बंदूक, दोन शक्तीमान एक्सप्रेस 12 या कंपनीची जिवंत काडतुसे, मोबाईल, लोखंडी बॅटरी, हेडटॉर्च असे एकूण 60 हजार 350 रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली असून नाटे पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)25 सह भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 30-10-2024

Tata punch