चिपळूण आगारातून आषाढी वारीसाठी जादा गाड्या

Jun 14, 2024 - 10:51
Jun 14, 2024 - 10:52
 0
चिपळूण  आगारातून आषाढी वारीसाठी जादा गाड्या

चिपळूण : पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठूनामाचा जयघोष' करत श्री क्षेत्र पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी यात्राकाळात एसटी प्रवाशांसाठी विशेष जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ग्रुप बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन चिपळूण आगाराचे प्रमुख दीपक चव्हाण यांनी केले आहे.

विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक प्रवासी खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीबरोबर पायी चालत जातात. या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. ४० पेक्षा जास्त भाविकांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात, या प्रवासातदेखील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीटदरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सरकारच्या सवलत योजना लागू राहणार आहेत.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो वारकऱ्यांसाठी विविध विभागांतून बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भाविक, प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासीसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow