मंडणगड : गुडेघर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताला पावसाळ्यात 'प्लास्टिक'चा आधार

Jun 14, 2024 - 12:27
Jun 14, 2024 - 12:31
 0
मंडणगड : गुडेघर येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छताला पावसाळ्यात 'प्लास्टिक'चा आधार

मंडणगड : निसर्ग चक्रीवादळामध्ये गुडेघर शाळेच्या छपराची हानी झाली होती. निसर्ग चक्रीवादळ होऊन चार वर्षे झाली तरीही शासनाकडून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे गुडेघर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर प्लास्टिक कापड टाकून पावसाळ्यात होणारी गळती थांबवली आहे.

तालुक्यातील गुडेघर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेच्या ४ वर्गखोल्या असून, एक किचनशेड आहे. गुडेघर परिसर आणि येथील बौद्धवाडीसाठी असलेल्या या शाळेच्या इमारतीच्या छपराची २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळात हानी झाली होती. या घटनेला चार वर्षे झाली; मात्र जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. शाळेत लहान वयाची मुले प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी येतात. त्या लहान बालकांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक वर्षी गुडेघर ग्रामस्थ शाळेच्या इमारतीवर प्लास्टिक टाकतात. यंदाही दुरुस्ती न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने गतवर्षीप्रमाणेच कार्यवाही केली आहे. ग्रामस्थांनी स्वः खर्चाने प्लास्टिक टाकले, त्यामध्ये गुडेघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शांताराम जाधव, संदीप बैंकर, वसंत वैराग, वसंत शिगवण, अंकुश कदम, मनोज वैराग, अनंत कुळे, मिलिंद पवार, सचिन पवार, सुमित पवार आदी गावांतील स्थानिक तसेच मुंबईत राहणाऱ्या ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

शासन, प्रशासन उदासीन
मागील चार वर्षापासून शासनाचे उंबरठे झिजवून झाले आहेत. वेळोवेळी पत्रव्यवहारही केला. प्रत्यक्ष भेटीद्वारे लोकप्रतिनिधीना सांगूनही झाले; पण कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुडेघर गावातील महत्त्वाची समस्या अजूनही प्रलंबितच आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राबाबत असलेली शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow