गुहागर : 'जल जीवन'चे काम दर्जेदार नसल्यास दंडात्मक कारवाई; सीईओ किर्तीकिरण पुजार यांचा इशारा

Jun 29, 2024 - 13:01
Jun 29, 2024 - 15:07
 0
गुहागर : 'जल जीवन'चे काम दर्जेदार नसल्यास दंडात्मक कारवाई; सीईओ किर्तीकिरण पुजार यांचा इशारा

गुहागर : गुहागर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत संबंधित ग्रा.पं.च्या सरपंचांनी ठेकेदारांमुळे कामे अर्धवट स्थितीत असल्याची तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्याकडे केली, यावर पुजार यांनी सर्व कंत्राटदारांना कडक शब्दांत समज देऊन यापुढे जल जीवनच्या कामासंदर्भात इंजिनियर व ठेकेदार यांनी एकत्रित भेट देऊन ग्रामपंचायतीशी समन्वय साधावा अशा सूचनाही केल्या, तसेच काम दर्जेदार नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कड़क इशारा दिला.

तालुक्यात सुरू असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी विशेष सभा गुहागरमध्ये घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी केली तालुक्यातील परचुरी- डाफळेवाडी, पिंपर, जानवळे आदी ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत असल्याचे सांगण्यात आले. यावर संबंधित कंत्राटदाराने ३० ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करतो असे सांगितले. मुंढर खुर्द येथे नव्याने बांधलेल्या टाकीला गळती होती.

याची डागडुजी केल्यानंतर पुन्हा गळती कायम असल्याने टाकीचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे ही गंभीर बाब असून काम दर्जेदार नसेल तर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. वरवेली येथील योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून काम करणाऱ्यांना साहित्य मिळत नाही. तसेच किरकोळ कामांसाठी काम अपूर्ण आहे.

तक्रारीचा वाचला पाढा
कंत्राटदाराच्या असहकार्यामुळे वरवेली गाव 'हर घर जल' घोषित होण्याचे राहिल्याचा आरोप करत पुढे अशीच स्थिती राहिल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सरपंच नारायण यांनी  सभेत दिला.
साखरीत्रिशूल मोहल्ला येथे वर्षभरापूर्वी दीड किलोमीटर पाईपलाईन खोदल्यानंतर पुन्हा कंत्राटदाराने काम सुरू केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे सरपंच सचिन म्हस्कर यांनी सांगितले.

दोडवली येथे अर्धवट स्थितीत विहीर खोदून सहा महिने झाले तरी कंत्राटदार बेपत्ता आहे. या विहीरीला संरक्षक कठडा नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, बांधकाम विभाग उपअभियंता संजय सहनाके, प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, अभियंता मंदार छत्रे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow