रत्नागिरीत प्लास्टिक कचरा संकलन होणार

Jun 18, 2024 - 15:09
 0
रत्नागिरीत प्लास्टिक कचरा संकलन होणार

त्नागिरी : अनबॉक्स - युअर डिझायरतर्फे येथे ''कचरा व्यवस्थापनाची पुढील दिशा'' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.

पुण्यातील ''पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन'' संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. राजेश मणेरीकर, चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, ''करो संभव'' या इ-कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधी आसावरी पाटील, पुण्यातील 'रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स' कंपनीच्या संचालक डॉ. मेधा ताडपत्रीकर, ''रत्नाग्रीन टेक्नॉलिजीज'' चे मनीष आपटे हे या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

गेली दहा-पंधरा वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ कचरा संकलन आणि पुनर्चक्रीकरण या क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव या मंडळींनी सांगितले. पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था पुणे शहर परिसरात प्लास्टिक, इ-कचरा आणि जुने कपडे यांच्या संकलन आणि पुनर्चक्रीकरणाचे कार्य करते. चिपळूण शहर व परिसरात घरोघरी जाऊन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा उपक्रम ''सह्याद्री निसर्गमित्र'' संस्थेतर्फे गेली पाच वर्षे सुरू आहे. पुण्यातील 'रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स'' या कंपनीतर्फे प्लास्टिकपासून इंधननिर्मिती केली जाते व पुणे शहरात सोसायट्यांमध्ये जाऊन प्लास्टिक कचरा संकलन केले जाते. ''करो संभव'' या कंपनीचे संपूर्ण भारतात इ-कचरा संकलनाचे जाळे आहे. ''रत्नाग्रीन टेक्नॉलॉजीज''तर्फे रत्नागिरी शहर परिसरात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठीचे कंपोस्टर्स बनवले व वितरित केले जातात.

''अनबॉक्स - युअर डिझायर'' या गौरांग आगाशे यांनी तयार केलेल्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपद्वारे रत्नागिरी शहरात घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा संकलनाचा उपक्रम जानेवारी २०२४ पासून सुरू आहे. निसर्गात प्रचंड प्रमाणात फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि अन्य कचऱ्याची समस्या भीषण आहे. याचे योग्य रीतीने संकलन आणि पुनर्चक्रीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, संकलन आणि वर्गीकरणाचा खर्च खूप आहे. कचऱ्याचे वर्गीकरण घरातच झाले पाहिजे, जेणेकरून संकलनाचे काम सोपे जाते. अशा मुद्द्यांवर या चर्चासत्रात चर्चा झाली. रत्नागिरीत कचरा संकलनाचे कार्य मोठ्या पातळीवर करण्यास इच्छुक असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक गौरांग आगाशे आणि हर्षद तुळपुळे यांनी सांगितले.

रत्नागिरीत सुरू केलेला प्लास्टिक संकलनाचा उपक्रम स्तुत्य असून याला बळ देण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहोत, असे आश्वासन डॉ. राजेश मणेरीकर आणि भाऊ काटदरे यांनी दिले. रत्नागिरी शहरातून सुमारे २० लोक या चर्चासत्राला उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow