चिपळुणात 24 तासांत 182.33 मिमी पावसाची नोंद

Jul 9, 2024 - 11:30
 0
चिपळुणात 24 तासांत 182.33 मिमी पावसाची नोंद

चिपळूण : गेल्या दोन तीन दिवसांपासून येथे पावसाचा जोर वाढला आहे. असे असले तरी वाशिष्ठी व शिवनदीची पाणी पातळी नियंत्रणात आहे. गेल्या २४ तासांत चिपळूण तालुक्यात १८२.३३ मि. मी.पाऊस पडला असून, सोमवार अखेर सरासरी १४६७.०४ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे अंतिम टप्यातील भात लावणीच्या कामांना अधिक वेग आला आहे.

यावर्षी पावसाने वेळेत म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यातच हजेरी लावल्याने साहजिकच शेतीची कामे बळीराजाच्या वेळापत्रकानुसार सुरू आहेत. त्यामुळे सध्या भातलावणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. असे असताना गेले काही दिवस काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात लावणीच्या कामांची गती थोडी कमी झाली होती. मात्र, आता पावसाचा जोर वाढल्याने भात लावणीच्या उर्वरित कामांनाही वेग आला आहे. रविवारी - सोमवारी येथे दिवसभर पावसाचा जोर होता. रविवारी सायंकाळी तो अधिकच वाढल्याने शहरातील अनंत आईस फॅक्टरी, बहादूरशेखनाका येथे गटारांचे पाणी रस्त्यांवर आले होते. त्यामुळे येथून होणारी वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली होती.

मागील २४ तासांत झालेला पाऊस

गेल्या २४ तासांत चिपळूण मंडळात १७२ मि.मी, खेर्डी १७०, वहाळ १८९, असुर्डे १७४, मार्गताम्हाणे २३५, सावर्डे २०५, कळकवणे १४९ रामपूर १७४, शिरगाव १८३ असा चिपळूण तालुक्यात सरासरी १८२. ३३ मि. मी., तर आत्तापर्यंत १२८३.७१ मि.मी पाऊस पडल्याची नोंद तहसील कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे.

मिरजोळीत पावसाचे पाणी मार्गावरच 

गुहागर मार्गावर मिरजोळी-साखरवाडी येथे येणारे पाणी अडवण्यासाठी तब्बल २५ वर्षांनी येथील मोरी मोकळी करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांशी पाण्याचा निचरा गटातून होत असला तरी दुसऱ्या बाजूने एका दुकानदाराच्या विरोधामुळे गटार काढले न गेल्याने पाणी मार्गावरच येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा पडल्याने या खड्यांसह पाण्यातून मार्ग काढणे वाहन चालकांसह ग्रामस्थांना कठीण बनले आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने होणारा विरोध लक्षात न घेता दुसऱ्या बाजूनेही राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्पुरते गटार काढण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 09-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow