देवरुखातील चित्रशाळेत मूर्तिकारांची लगबग; प्रभू श्रीरामांसह राममंदिरची मूर्तीचं आकर्षण

Jun 19, 2024 - 14:28
Jun 19, 2024 - 15:35
 0
देवरुखातील चित्रशाळेत मूर्तिकारांची लगबग; प्रभू श्रीरामांसह राममंदिरची मूर्तीचं आकर्षण

साडवली : यंदाच्या गणेश उत्सवाला अजून दोन महिन्यांचा अवधी असला, तरी देवरूख स्टेट बँकेनजीकच्या मंगलमूर्ती चित्रशाळेत मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. विविध रूपांतील गणेश मूर्तींना आकार व रंग देण्यात येथील मूर्तिकार व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रशाळेतील राममंदिर व प्रभू राम यांच्यासमवेत असलेली मूर्ती सध्या आकर्षण ठरत आहेत.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरुखातील मंगलमूर्ती चित्रशाळेतील मूर्तिकारांनी कामाला वेग घेतला आहे. महादेव, जयमल्हार व विष्णू रुपासह विविध आकर्षक अशा ३५० हून अधिक मूर्ती याठिकाणी उपलब्ध आहेत. येथील मूर्तिकार दत्ता शिंदे व मंगेश नलावडे यांच्यासह ५ कामगार या ठिकाणी मूर्तीना रंग व आकर्षक रूप देण्याचे काम करत आहेत.

या चित्रशाळेतील गणेशमूर्ती बूक करण्यासाठी गणेशभक्त येऊ लागले आहेत. देवरुख, साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी, पाली, देवळे आदी भागात याठिकाणच्या गणेशमूर्तीना मागणी आहे. गतवर्षी सांगली येथून गणेशमूर्तीची मागणी करण्यात आली होती.

२५ वर्षांपासूनची परंपरा
या चित्रशाळेत गेली २५ वर्षांहून अधिक काळापासून गणेशमूर्ती घडविण्याचे काम केले जात आहे. येथील मूर्ती रंगकामासाठी खास प्रसिद्ध आहेत. साधारण ६ फुटांपर्यंत या ठिकाणी गणेशमूर्ती उपलब्ध आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow