वाटद कवठेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भात व नाचणी पिकाची लावणी 

Jul 19, 2024 - 09:43
 0
वाटद कवठेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भात व नाचणी पिकाची लावणी 

◼️ अनेक वर्षे विनावापर असलेल्या जमिनीत पालकांच्या सहाय्याने मशागत करून लागवड

◼️ शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार रमल्या विद्यार्थ्यांसमवेत शेती उपक्रमात

खंडाळा : विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे, नाचणी भात लावणीचे प्रात्यक्षिक समजावे आणि विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कार्यानुभव विषय आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने भात आणि नाचणी पिकाची लावणी केली. 

यासाठी मागील अनेक वर्षे शाळेच्या आजूबाजूला विनावापर असलेल्या शेतीचा उपयोग करण्यात आला. त्यासंदर्भात शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने संबंधित जमीन मालक श्रीम. रंजना रघुनाथ धनावडे यांच्याशी चर्चा करून शाळेच्या विद्यार्थ्यांना लावणी करण्यासाठी जमीन मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनीही लगेच जमीन देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर शाळेच्या वतीने पालकांनी आज्ञेश तांबटकर व मुकुंद घवाळी यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जमीनीची फोड केली. चिखल झाल्यानंतर नाचणी व भात कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक प्रसिद्ध शेतकरी भाऊ धनावडे, मारुती कुर्टे, स्वाती धनावडे, मनस्वी तांबटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाचणी व भात या रोपांची लागवड केली.

विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची माहिती होतानाच स्वतः त्यामध्ये लागवड केल्यास भविष्यात ती जाणीव त्यांच्यामध्ये कायम राहील म्हणून हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेने मागील काही वर्षापासून सुरुवात केली. त्यासोबतच धावत्या जीवनशैली मध्ये शेतीकडे आणि पौष्टिक बाबीकडे होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने मागील वर्षे  २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबतीत जनजागृती निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होईल. तसेच या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या  धान्यातून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा माजी सरपंच अप्पा धनावडे यांनी व्यक्त केली.

कवठेवाडी शाळेने कार्यानुभव विषयांतर्गत राबविलेला शेती लागवड हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणारा असून या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष स्वरूपात घेतलेला अनुभव ज्ञान समृद्ध करणारा ठरला असल्याची माहिती गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनी दिली.

या उपक्रमांतर्गत विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. याकामी विलास बारगुडे, प्रविणा धनावडे, नीलम धनावडे, निकिता कुर्टे, प्रज्ञा धनावडे, प्रेरणा धनावडे, दिव्या कुर्टे, सरिता वरवटकर, वेदिका धनावडे, रेश्मा कुर्टे, समिक्षा कुर्टे, घवाळी मॅडम यांच्यासह सर्व पालक आणि ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. यांनी सहकार्य केले.

तर या उपक्रमाचे नियोजन शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या मदतीने केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि शिक्षका राधा नारायणकर यांनी केले. विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow