रत्नागिरी : वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलैला आंदोलन

Jun 21, 2024 - 12:36
 0
रत्नागिरी : वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलैला आंदोलन

रत्नागिरी : तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांची पगारवाढ, समान वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ९ जुलै रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शन करणार आहे. त्यात रत्नागिरीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलेले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कामगार वर्गात तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. २७ जूनला सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी सरकार जगाओ आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मंत्री आमदार व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर विधी मंडळात आवाज उठवून कामगारांना न्याय द्यावा, याकरिता निवेदन दिले जाणार आहे. तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांची पगारवाढ करावी, वेतन एक समान करावे, नोकरीला सुरक्षा मिळावी यासाठी हरियाना सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, नवीन भरतीत कुशल व अनुभवी कामगारांना वयात सवलत मिळावी, नोकरीत विशेष आरक्षण व प्राधान्य मिळावे, या मागण्यांवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निर्णय झाले होते.

मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडून सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशनावेळी ९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन होणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघांचे राज्य अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे. त्यानुसार 'सरकार जगाओ' आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारही सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीने सभासदांना आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow