शीळ धरण ते नवीन जॅकवेलपर्यंतचे काम पुन्हा या कारणासाठी थांबले...

Jun 25, 2024 - 11:16
 0
शीळ धरण ते नवीन जॅकवेलपर्यंतचे काम पुन्हा या कारणासाठी थांबले...

रत्नागिरी : शीळ धरण ते नवीन जॅकवेलपर्यंतच्या सुमारे ७६० मीटर पाईपच्या कामाला पुन्हा खो बसला आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे; परंतु काही पाईप आणि जॉईंट्स कमी पडत असल्याने काम थांबले आहे. हे साहित्य कोलकात्याहून मागवण्यात आले आहे. ते येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे अजून फ्लोटिंग पंपाचाच पाणीपुरवठ्याला आधार आहे.

शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यातच शीळ जॅकवेल कोसळले आणि शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, मुंबईहून फ्लोटिंग पंप बसवण्यासाठी आलेली टीम, पालकमंत्री उदय सामंत यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले. सुधारित पाणीयोजनेंतर्गत जुन्या जॅकवेलच्या जवळच नवीन जॅकवेल बांधण्यात आले होते. त्यामुळे तत्काळ या जॅकवलेवर नवीन पंप बसवून जॅकवलेमध्ये शीळ नदीतून पाणी आणण्यासाठी फ्लोटिंग पंप टाकण्यात आले. त्यामुळे लगेचच शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मुळात शीळ जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठी शीळ धरण ते जॅकवेल अशी ७६० मीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार होती. सुधारित पाणीयोजनेतील हे काम आहे; परंतु वर्ष झाले तर त्याकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. दुसरा पावसाळा आला तरी फ्लोटिंग पंपावरच शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे. पावसात पूरस्थिती निर्माण झाली तर हे फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती आहे. तसे झाले तर पुन्हा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रसारमाध्यमांनीही ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ७६० मीटरचे खोदकाम सुरू केले. चर मारून झाले आहेत. एमएस पाईप कोलकात्याहून मागवण्यात आले. आता हे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. लाईन वॉशही केली; परंतु त्या कामालाही खो बसला. काही पाईप आणि जॉईन्ट्स नसल्याने हे थांबले आहे. पुन्हा कोलकात्यावरून साहित्य मागवण्यात आले आहे. ते आल्यानंतर हे काम पूर्ण होणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow