महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

May 29, 2024 - 14:42
May 29, 2024 - 16:35
 0
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी पक्ष, विरोधक आणि देशासंबंधीच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक भावना उघड केल्या. विरोधकांमध्ये तुम्हाला कोणता नेता आवडतो असे विचारले असता, पंतप्रधानांनी मुत्सद्दी भूमिका कायम ठेवली आणि नाव सांगण्यास नकार दिला. पण नेत्यांसोबत असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांची कबुली दिली. यावेळी मोदींनी अनेकदा सोनिया गांधींच्या आरोग्याच्या प्रश्नादरम्यान पाठिंबा देण्यासारख्या उदाहरणांचाही उल्लेख केला. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे.

महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा चित्रपट बनला तेव्हा जगभरात त्यांच्याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये केलं आहे. महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आपण ७५ वर्षांत काहीही केलं नाही, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

"१९व्या दशकातील कायदे मला २१ व्या दशकात बदलावे लागत आहेत. हे आधीच व्हायला हवं होतं. आता प्रश्न फक्त आपल्या तीर्थक्षेत्रांचा नाही. महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. पण गेल्या ७५ वर्षात महात्मा गांधी यांना जगाने ओळखावं ही आपली जबाबदारी नव्हती का?मला माफ करा पण त्यांना कोणीही ओळखत नाही. पहिल्यांदा महात्मा गांधी चित्रपट तयार झाला तेव्हा जगभरात गांधी कोण आहेत? याबाबत कुतूहल निर्माण झालं. आपण हे केलं नाही. हे देशाचं काम होतं. जर मार्टिन ल्यूथर किंग यांना जग ओळखतं. नेन्सन मंडेला यांना ओळखलं जाते. मात्र, महात्मा गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलो आहे. मात्र, गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचे समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलं आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रोहित पवारांची टीका

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. "गांधी विचार म्हणून ज्यांचे विचार जगभर अजरामर आहेत, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि उपोषण व सत्याग्रहाचं अस्त्र दिलं, ज्यांचे आदर्श म्हणून जगभर पुतळे उभारले गेले त्या 'महात्मा गांधीजींना जगात कुणी ओळखत नव्हतं,' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आहे. ही टेलिप्रॉम्प्टरची चूक आहे की वैचारिक दारिद्र्य असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या ब्रीफची, हे कळत नाही. तसं असेल तर अशा अधिकाऱ्यांना मोदी साहेबांनी तातडीने दूर केलं पाहीजे. जेणेकरुन चुकीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाची गरीमा कमी होणार नाही आणि राष्ट्रपुरुषाबाबत चुकीची माहितीही प्रसारीत होणार नाही. शिवाय गांधी हा विचार असल्याने त्याला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नसते. हा विचार लोक स्वतःहूनच स्वीकारत असतात," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 29-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow