Kolhapur Flood : कोल्हापूर मधील ६० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

Jul 27, 2024 - 10:42
 0
Kolhapur Flood : कोल्हापूर मधील ६० हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्यक्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा, कुंभी, कासारी, कडवी, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा आदी नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी या नद्यांच्या परिसरात विस्तीर्ण पसरलेले आहे. नदी, ओढ्यांच्या पाण्याखाली उभी पिके गेली आहेत.

ऊस, भात, सोयाबीन आठ दिवस पाण्याखाली आहेत. पाण्याबरोबर येणारी माती, कचऱ्यामुळे पिकांचे नुकसान होते. पिकाच्या शेंड्यावर माती थांबली की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

खराब होण्याची प्रक्रिया अशी सुरू होते
ऊस
सलग आठ दिवस उसाचा शेंडा पाण्याखाली राहिला तर नुकसान अधिक होते. शेंड्यात माती, कचरा राहिल्याने उसाचे कांडे वरून खालपर्यंत वाळत येते. प्रत्येक कांडीला फुटवा येऊन पोकळ होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.

भात
भात उंचीने कमी असल्याने थोडे जरी पाणी पात्राबाहेर पडले तर पीक पाण्याखाली जाते. चार-पाच दिवस सलग भात पाण्याखाली राहिले तर खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते.

सोयाबीन
सोयाबीनला जास्त पाणी सहन होत नाही. दोन ते तीन दिवस पाण्याखाली राहिले की कुजण्यास सुरुवात होते.

पुराच्या पाण्याचा थेट फटका ७२ गावांना बसला आहे. पुराच्या पाण्याखाली ऊस, भात, सोयाबीन पिके आहेत. पाणी लवकर उतरले नाही तर नुकसान होणार आहे. अजून पाऊस सुरूच असल्याने नेमके किती क्षेत्र पाण्याखाली आहे, याचा अंदाज येणार नाही. - अजय कुलकर्णी (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow