रत्नागिरी : भाजपतर्फे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

Jul 27, 2024 - 10:59
 0
रत्नागिरी : भाजपतर्फे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

त्नागिरी : गेला महिनाभर रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती झाल्यामुळे भाजप रत्नागिरी शहर शाखेने खड्डयामध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करत शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली.

तीन-चार ठिकाणी झाडे लावून खड्ड्यांमध्ये बसून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर नगरपालिकेवर धडक मारत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली.

रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, एसटी स्टॅंड, तेली आळी नाका व जयस्तंभ येथे प्रतीकात्मक वृक्षारोपण करत आंदोलन केले. पालिकेवर धडक मारल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना बोलावण्यात आले, परंतु मुख्याधिकारी बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. ते येईपर्यंत आम्ही वाट पाहू, असे सांगितल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना फोन करण्यात आला. त्यांनी दहा मिनिटात येतो असे सांगितले आणि मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित झाले, त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रस्त्याचा दर्जा चांगला नाही, डांबर चांगले नाही, यामुळे खडी रस्त्यावर आली आहे. या खड्ड्यांमध्ये पडून जे जखमी झाले आहेत, त्यांना पालिकेने नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच डांबरीकरणाचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणीही भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी भाजपाचे राजेंद्र फाळके यांनी सांगितले की, खड्डे भरण्यासंबंधी प्रशासनाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन दिले होते. प्रशासनाने खड्डे बुजविले नाहीत. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला काळ्या यादीत टाकावे. कामे व्यवस्थित करणार नसाल तर मोठ्या स्वरूपात आंदोलन करावे लागेल. सर्व नागरिकांना घेऊन आम्ही आंदोलन करू. रस्त्याच्या परिस्थितीमुळे नागरिक पडत आहेत, डांबरीकरणाची खडी वाहून जात आहे. याकडे कोणी लक्ष देत नाही. पालिकेत अंदाधुंद कारभार सुरू आहे.

माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना फैलावर घेतले. माजी नगरसेवक राजू तोडणकर यांनी सांगितले की, शहरात डेंग्यूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. एवढ्या मोठ्या शहरात फक्त चार माणसं फवारणी करत आहेत. ते शक्य नाही. माणसे वाढवावीत.खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करू, असे आश्वासन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow