ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Jul 25, 2024 - 10:06
 0
ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झालं आहे. ८२ वर्षीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो मागील काही दिवसांपासून आजारी होते.

गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी ६ वाजता विरारच्या नंदाखाल येथील चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धाराशीव येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे फादर दिब्रिटो हे अध्यक्ष होते.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी इथल्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३:३० वाजेपर्यंत त्यांच्या जेलाडी येथील राहत्या घरी ठेवण्यात येथील. त्यानंतर ४ वाजेपासून नंदाखाल येथील पवित्र आत्म्याचे चर्च येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती बिशप हाऊस मधून देण्यात आली आहे.

साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख होती. वसईमधील वटार गावात ४ डिसेंबर १९४३ रोजी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म झाला होता. १० वर्षे विविध विषयांचं शिक्षण घेतल्यानंतर १९७२ साली ते धर्मगुरू झाले. १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी अशी होती. 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow