राजापूर : वाटूळ येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला १५ ऑगस्टपूर्वी मंजुरी

Jul 8, 2024 - 11:27
Jul 8, 2024 - 12:27
 0
राजापूर : वाटूळ येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला १५ ऑगस्टपूर्वी मंजुरी

त्नागिरी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल महत्त्वाचे आहे. वाटूळ (ता. राजापूर) येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक प्रस्तावित असलेल्या हॉस्पिटलच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून १५ ऑगस्टपूर्वी मंजुरी मिळेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी राजापूर येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या हॉस्पिटलमुळे पंचक्रोशी ग्रामविकास समितीसह सार्यांकडून गेल्या काही वर्षांपासून सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीच्या मागणीसह केलेला पाठपुराव्याला यश आले आहे.

पालकमंत्री श्री. सामंत यांनी सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या जागेची वाटूळ येथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख दीपक नागले, अशफाक हाजू, बाबू म्हाप, पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सचिव विश्वास राघव, प्रशासकीय समितीचे प्रमुख आदिनाथ कपाळे, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजू पवार, वाटूळचे जागा मालक श्री. चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते.

राजापूरच्या विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. सामंत म्हणाले की, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला २५ पैकी ५ एकर जागा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिंधुरत्नचे निमंत्रित सदस्य किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त रंगा नायक यांच्याकडे सध्या हॉस्पिटलचा प्रस्ताव असून अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे तो जाईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून १५ ऑगस्टपूर्वी या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळेल.

वाटूळ येथील प्रस्तावित शासकीय जागेवर सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष उभारणीची कार्यवाही व्हावी, अशी मागणी या हॉस्पिटलसाठी पाठपुरावा करणार्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने पालकमंत्री श्री. सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. त्याबाबतचे निवेदनही समितीकडून देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन श्री. सामंत यांनी आज सकाळी वाटूळ येथील जागेची पाहणी केली. यावेळी पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सचिव श्री. राघव, प्रशासकीय समितीचे प्रमुख श्री. कपाळे, सुरेश मेस्त्री, संतोष जोगळे, प्रकाश दळवी, दीपक चौकेकर, अमोल सुतार, अक्षय तांबे, संतोष आरावकर, अविनाश राघव, सुधीर विचारे, अशफाक मापारी आदी पदाधिकारी, सदस्यांसह मनसेचे माजी तालुकाध्यक्ष राजू पवार, वाटूळ येथील जागा मालक श्री. चव्हाण उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावासह आराखड्याबाबत सविस्तर माहिती घेताना या प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू ठेवण्याची सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांना दिली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 08-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow