गणेशोत्सव व ईद-ए- मिलादच्या पार्श्वभूमीवर राजापुरात पोलिसांची नागरिकांसोबत बैठक

Sep 9, 2024 - 12:23
 0
गणेशोत्सव व ईद-ए- मिलादच्या  पार्श्वभूमीवर राजापुरात  पोलिसांची नागरिकांसोबत बैठक

राजापूर : आगामी गणेशोत्सव व ईद-ए- मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजापूर पोलिस ठाणे येथे श्री यशवंत केडगे उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा तसेच पाचल ग्रामपंचायत सभागृहात पाचल पंचक्रोशी हद्दीतील सरपंच, पोलिस पाटील, गावकरी, वाडीप्रमुख, मोहल्ला अध्यक्ष, तंटामुक्त अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, रिक्षा चालक यांची राजापूर तालुका पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आगामी सण गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, पावसाळी आपत्ती व्यवस्थापन दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. पोलिस पाटील पदाची कर्तव्ये समजावून सांगण्यात आली. 

गावात कोणत्याही प्रकारचा वाद असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात यावी, गावातील मंदिरातील प्रमुख व्यवस्थापक यांना मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सांगण्यात यावे, तसेच उत्सवादरम्यान देवीचे दागिने, मुखवटे व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवून दिवस रात्र स्वयंसेवक नेमण्यात यावेत, असे सूचित करण्यात आले.

गावातील ग्रामसुरक्षा दल यांचे समवेत गावात दिवसा व रात्री ग्राम मंदिर, बँक, बाजारपेठ परिसरात पेट्रोलिंग करावे, गावात येणारे फेरीवाले तसेच अन्य व्यावसायिक यांची आधार कार्ड, फोटो, मोबाईल नंबर आपलेकडे घेण्यात यावीत, गावामध्ये अन्य कोणताही अनुचित प्रकार घडत आल्यास तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क करणेबाबत सूचित करण्यात आले. गावातील मंदिरे, मशिद, दर्गा,
बुद्ध विहार चेक करून फोटो व्हॉटस्अॅप ग्रुपवर शेअर करण्याच्या सूचना दिल्या. महिला अत्याचार, पोस्को, तसेच सायबर क्राईमबाबत माहिती देण्यात आली. गावातील ज्वेलर्स व्यावसायिक, पतसंस्था यांना चोरीच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले. महिला व अल्पवयीन मुलींच्या विरुद्ध घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गावात लक्ष ठेवून त्या प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिस ठाण्यास कळविण्यात यावी, अशा प्रकारे अनेक विषयांवर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन राजापूर पोलिस निरीक्षक श्री, राजाराम चव्हाण यांच्याकडून उपस्थितीतांना यावेळी करण्यात आले.

राजापूर पोलिस गोपनीय विभागाचे सचिन वीर तसेच बहुसंख्येने परिसरातील गावचे पोलिस पाटील, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow