मंडणगड : निगडी येथे घरावर संरक्षण भिंत कोसळली

Jul 9, 2024 - 11:01
 0
मंडणगड : निगडी येथे  घरावर संरक्षण भिंत कोसळली

मंडणगड : दोन दिवसांपासून तालुक्यात रौद्ररूप धारण केलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले. तालुक्यातील तुळशी घाटात रविवारी मध्यरात्री मोठी दरड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक अन्य मार्गाने वळवायला लागली. मात्र, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली दरड काही तासांतच जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळी केली. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन गवारे व पोलिस कर्मचारी यांनी दरड बाजूला करणेकामी सहकार्य केले. प्रशासनाने ही दरड तातडीने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

दि. ८ जुलै २०२४ रोजी तालुक्यात सरासरी १६५.२५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील एका दिवसात पडणाऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचे हंगामास सुरुवात झाल्यापासून तालुक्यात १२८१.९८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 

तालुक्यातील सावित्री भारजा, निवळी या मुख्य नद्यांसह लहान मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. याचबरोबर चिंचाळी व भोळवली ही दोन धरणे पुर्णपणे भरली असून अन्य धरणे ९५ टक्याहून अधिक पातळीत भरली आहेत. मांदिवली व चिंचघर ला जोडणाऱ्या पुलासह तालुक्यातील अनेक ठिकाणांच्या मोरी व कॉजवेवरुन पाणी जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटल्याने तालुक्यातील जनजीवन काही काळाकरिता विस्कळीत झाले होते. मौजे निगडी येथील मनीषा निळकंठ खोपकर यांच्या घरावर बाजूला असलेली संरक्षण भिंत कोसळून घराचे भिंतींला तडे जाऊन नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशामुळे तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी देण्यात आली होती. तालुक्यात दोन दिवस संततधार पाऊस पडत असला तरी सुदैवाने वित्त व जीवतहानी झाल्याचे माहीती पुढे आलेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow