मंडणगड : माहू - तुळशी घाटात उभे कटिंग दरडी कोसळण्यास कारणीभूत

Jul 9, 2024 - 11:04
Jul 9, 2024 - 11:59
 0
मंडणगड : माहू - तुळशी घाटात उभे कटिंग दरडी कोसळण्यास कारणीभूत

मंडणगड : माहू ते तुळशी घाटात वारंवार कोसळणाऱ्या दरडीमुळे भविष्यकालीन धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मॉन्सून सुरू झाल्यापासून तुळशी घाटात दररोज कोसळणाऱ्या दरडी साफ करण्यासाठी प्रशासनास ताकद व वेळ खर्च करावा लागत आहे. नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास न करता राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेली उभी कटिंग ही या सर्वाला कारणीभूत ठरत आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाचे कामासाठी बाराव्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या मंडणगड किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी अनेक ठिकाणी उत्खनन करण्यात आले. तुळशी घाटातील जुना रस्ता किल्ल्याच्या पायथ्याने डोंगराला किमान १५ वळसे घालून पूर्ण होतो. यंदा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या प्रयोजनार्थ अनेक ठिकाणी वाकणे रूंद करण्यासाठी याचबरोबर रस्ता खोदण्यासाठी डोंगराच्या बाजूने उभी खोदाई करण्यात आली आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक संदर्भामुळे यापूर्वी या डोंगरपरिसरात काळ्या दगडाच्या खोदाई करण्यासाठीही अनेक परवानग्या घ्यावा लागत असत. याचबरोबर यापूर्वी ४० वर्षे आधी तयार झालेला रस्ता येथील पर्यावरणाचा समतोल ढासळणार नाही, या बेताने तयार करण्यात आला असल्याने दरड कोसळण्याच्या घटना अभावानेच घडत असत. यंदा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात येत असताना जास्तीचे जमीन अधिग्रहण करावे लागू नये यासाठी प्राधिकरण व ठेकेदाराने रस्त्याचे जुन्या हद्दीतच उभे कटिंग केले. हे कटिंग तिरके असणे गरजेचे होते; मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराकडील बाजूने दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरडी कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. डोंगराकडील आणि खोल दरीकडील बाजूने संरक्षक भिंती व अन्य उपाययोजना करण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow