रिफायनरी समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार : खा. नारायण राणे

Jul 11, 2024 - 10:16
Jul 11, 2024 - 10:19
 0
रिफायनरी समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार : खा. नारायण राणे

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी नुसता प्रयत्न नाही, तर वातावरणनिर्मिती करणार आहोत. जे विरोध करीत आहेत, त्यांना प्रकल्पाची माहिती देऊन समजावून सांगितले जाईल. स्थानिकांना विरोधासाठी भडकावत आहेत, त्यांनी कधी स्थानिकांच्या हाताला काम दिले आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पाऊस गेल्यानंतर रिफानरीचे स्वागत करण्यासाठी समर्थनार्थ भव्य मोर्चा काढू. विरोधकांना जे समजायचे ते समजून जावे, असे स्पष्ट मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले.

नाट्यगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग चांगल्या दर्जाचा लवकर होण्यासाठी ठेकेदाराला टाईमबॉण्ड दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे भाजपतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी माध्यम उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग व्यवसाय वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांना चांगले शिक्षण देऊन कुशल केले जाईल. त्यामुळे त्यांना नोकरी मिळून उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. बारसू रिफायनरी प्रकल्प येण्यासाठी माझा
नुसता प्रयत्न सुरू नाही, तर माझ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा उद्योग आणायचाच आहे. त्यासाठी वातावरण तयार करून पाऊस गेल्यावर रिफायनरीचे दणक्यात स्वागत केले जाईल. विरोध करणाऱ्यांना काय समजायचे ते समजू द्या; पण समर्थनार्थ एक भव्य मोर्चा काढला जाईल. जिल्ह्यात जे उद्योग येतील ते आणणार. आधुनिक टेक्नॉलॉजी कशी येईल, यासाठी माझा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आल्यानंतर आपोआपच विमानतळ सुरू होईल. मी २० दिवासांनंतर येणार आहे. तेव्हा याबाबतचा आढावा घेणार आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण का रखडले आहे, याबाबतही अधिकारी, ठेकादारांना बोलवून माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना टाईमबाऊंड दिला जाईल. त्याच कालावधीत हा महामार्ग पूर्ण करून घेऊ. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी फाईवस्टार हॉटेलसह अन्य पायाभूत सुविधांची गरज आहे. पर्यटकांना काय आवश्यक आहे. त्यांची आवड, निवड, याचा विचार करून सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच पर्यटन वाढणार आहे. येत्या काही काळात सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा करण्याचा प्रयत्न आहे, असे खा. राणे यांनी सांगितले. जलजीवन मिशन योजनेबाबत काही तक्रारी आल्या आहेत. या योजनेचीही माहिती अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन दर्जेदार कामे कशी होतील याबाबत प्रयत्न करू, त्याची चौकशी करू आणि राणे आले म्हणजे दर्जा आला, असेही त्यांनी सांगितले. कोणत्या प्रकल्पाने पर्यावरण खराब होईल, हे मला माहीत आहे. अमेरिका, युरोप मध्ये मी फिरलो आहे. तेथेही हे प्रकल्प आहे. तेथे काही झाले नाही. परंतु पैसे मिळेपर्यंत अशा प्रकल्पाना विरोध होतो. कोळशापासून वीज बनविणारे ५० कंपन्या उद्धव ठाकरेना भेटायला गेल्या. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला तर आमच्या कोळशावरील वीज कोण घेणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद पाडण्यासाठी ५० कोटीची तडजोड झाली. त्यापैकी ५ कोटी रुपये ठाकरेंना मिळाले. हे मी विधानसभेत देखील रेकॉर्डवर बोललो आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्प गेला, असा आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

विधानसभेच्या २ जागा घेणार
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी एकही भाजपचा आमदार नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीत २ जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही आहे; परंतु त्या कोणत्या ते आता सांगणार नाही. मात्र दोन जागा घेणार, अशी भूमिकाही राणे यांनी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow