रत्नागिरी : पावसमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना मार्गदर्शन केल्याच्या नावाखाली पैसे उकळले

Jul 15, 2024 - 12:14
Jul 15, 2024 - 12:20
 0
रत्नागिरी : पावसमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना मार्गदर्शन केल्याच्या नावाखाली पैसे उकळले

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत गावागावांमध्ये महिलांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पावस परिसरात असलेल्या काही गावांमध्ये हे अर्ज भरताना मार्गदर्शन केल्याच्या नावाखाली या महिलांकडून प्रत्येकी ५० रुपये उकळण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही दिवसांपूर्वी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील काही तालुक्यांमध्ये या योजनेसाठीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागातील काही कर्मचारी अर्जदारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधितांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. असे असताना पावस परिसरामध्ये अर्जदार महिलांकडून खुलेआम पैसे घेतले जात आहेत.

संबंधितांची तक्रार करायची झाल्यास ते दाखले देण्यात अडथळा आणतील, या भीतीने महिला तक्रार करत नाहीत, याचाच गैरफायदा घेत महिलांकडून पैसे घेतले जात आहेत विशेषतः शेतमजूर महिलांची पिळवणूक होत आहे. एकतर रोजंदारी बुडवून या योजनेचा अर्ज भरण्यासाठी धडपड करायची आणि दुसरीकडे अकारण पैसे देऊन नुकसान करून घ्यायचे हा काय प्रकार आहे? असा प्रश्र विचारला जात आहे. याची दखल घेऊन संबंधित यंत्रणेने पैसे उकळणाऱ्यावर कारवाई करावी करावी आणि या योजनेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. हे महिलांना पटवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 15/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow